निवडणूक आयोगाच्या नोटीसीचा पाठपुरावा करून उत्तर देऊ : नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुप्त लाटेमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला आहे. तसेच काही पक्षांचे राष्ट्रीयत्व देखील धोक्यात आले आहे. जनतेच्या धक्क्यानंतर आता निवडणूक आयोगही भाजप विरोधी पक्षांना धक्का देणार आहे. हा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील बसणार आहे. कारण आयोगाने अनेक पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. अशा पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश आहे.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘अशा नोटीसा येत राहतात त्याचा आम्ही पाठपूरावा करून उत्तर देवू, असे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना मलिक यांनी ‘२०१४ साली अशाच प्रकारे नोटीस आली होती. आम्ही छोट्या-छोट्या राज्यात निवडणुक लढवत आहोत. त्यात आम्हांला बऱ्यापैकी मतदान होत आहे आणि येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुक सुद्धा आहे. त्यामुळे या नोटीसला आम्ही कायद्याचा अभ्यास करून उत्तर देवू असे विधान केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपच्या बलाढ्य आव्हानासमोर झुकावे लागले. ४८ मतदारसंघातून कॉंग्रेस – राष्ट्रवादीला अवघ्या ५ जागा मिळवता आल्या. तर अनेक मतदारसंघातील अस्तित्व देखील धोक्यात आले.