…त्यामुळे भाजप योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणारच; भाजप नेत्याचा दावा

मुंबई : २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हात मिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यामुळे सर्वाधिक आमदार असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, हे सरकार भिन्न विचारधारेच्या पक्षांचं असून लवकरच कोसळेल असं भाकीत भाजप नेत्यांनी केलं होतं.

या सरकारने दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून पुढील ‘टर्म’ मध्ये देखील हेच सरकार येईल असा दावा महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भाजपच्या समाधान आवताडेंनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव केला आहे.

त्यामुळे, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून फडणवीसांनी पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला होता.

आता, पंढरपूरकरांनी आवताडेंना विधानसभेत पाठवलं असून फडणवीस करेक्ट कार्यक्रम कधी करणार ? यावर कुजबुज सुरु झाली आहे. आता, ‘करेक्ट कार्यक्रमा’वर भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘फडणवीस जी विधानं करतात त्यात गंभीर आणि गर्भित इशारा असतो. त्यामुळे त्यांनी पंढरपूरात केलेले विधान हे गर्भितच होते, असं सांगत भाजप योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणारच,’ असं विधान शेलारांनी केलं आहे. तसेच, कोरोनाचं संकट असल्याने आमचं सर्व लक्ष कोरोना संकट दूर करण्यावर असल्याचंही ते म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या