सोलापूरमध्ये ५०० बेडचे कोविड हॉस्पीटल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

सोलापूर – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाही. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करून आक्रमक रणनिती तयार करून कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांचा शोध घ्या अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सोलापूर जिल्हा प्रशासनास दिल्या.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला या बैठकीला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, लॉकडाऊन हा पर्याय नाही. आक्रमक रणनिती बनवून ट्रेसिंग,टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर भर देऊन कोरोना संक्रमणाची साखळी तोडावी लागेल.भाजी मार्केट, दुकांनामध्ये लोक गर्दी करत आहेत.लग्न कार्यात नियमांपेक्षा जास्त लोक जमल्याने गर्दी होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, कोरोनाबाबत लोकजागृती आणि लोकशिक्षणावर भर द्यावा. सोलापूर हा विडी कामगारांचा जिल्हा आहे,विडी कामगार माता भगिनींची विशेष काळजी घ्या.

आता कोरोना जगण्याची संस्कृती उभी करावी लागेल. पुढच्या १०० दिवसांचे नियोजन करून अर्थव्यवस्था कार्यान्वित करा असा सूचना प्रशासनास दिल्या. यावेळी त्यांनी कोरोना यौद्ध्यांच्या कार्याचे कौतुकही केले. सोलापूरमध्ये ५०० खाटांचे कोविड रूग्णालय उभारण्याबाबत आपण मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाशी चर्चा करून पाठपुरावा करू असे सांगून आपण सर्वजण मिळून लोकांच्या साथीने कोरोनाला हरवू असा विश्वास महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीत बोलताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाला सहज घेऊ नका. ग्रामीण भागात जास्त रूग्णसंख्या असलेल्या भागात आणखी ट्रेसिंग आणि ट्रेसिंग वाढवा. मृत्यू दर कमी करण्यासाठी कोरोना बधितांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करा. विडी कामगार महिलांची अडचण होणार नाही,त्यांना रेशनिंगचे अन्नधान्य मिळेल याची काळजी घ्या अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत काही तक्रारी आहेत,मात्र सरकार या सेविकांच्या पाठीशी आहे. मागील महिन्यांपर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे असे ठाकूर म्हणाल्या.

या बैठकीत बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे म्हणाले की,सोलापूर प्रशासनाने चांगले काम केले आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे, शहरालगतच्या भागात रूग्णसंख्या वाढत आहे त्यासंदर्भाने काळजी घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात शहरात येत असल्याने शहरातील हॉस्पिटलवर ताण वाढतो आहे. त्यामुळे आम्हाला ५०० बेडचे हॉस्पिटल शहरात निर्माण करायचे आहे तसा प्रस्ताव बनवला आहे, त्याला आपण पाठबळ द्यावे अशी मागणी पालमंत्र्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’