‘वनगांना संसदेत पाठवायचं होतं पण त्यांची विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे’

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेकडून पालघर लोकसभेसाठी भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी आज, मंगळवारी खासदार गावित यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.

श्रीनिवास वनगांचा लोकसभेसाठी पत्ता कट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. श्रीनिवास वनगांना संसदेत पाठवायची माझी इच्छा होती. पण त्यांची विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे. श्रीनिवास वनगानं मला विधिमंडळात काम करू द्या, असं सांगितलं. त्याच्या इच्छेचा मी आदर राखतो, त्याला कोणत्याही मार्गानं आमदार म्हणून विधिमंडळात पाठवणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये पालघर लोकसभेच्या जागेवरून खल सुरू असताना अचानक पालघर लोकसभेची जागा आता सातारा पॅटर्ननुसार राबवली जात आहे. यासाठी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करताना, पालघरच्या जागेचा हट्ट धरला होता. अखेर गावितांच्या हातात शिवबंधन बांधून सेनेने पालघरची जागा आपल्याकडे ठेवली आहे.