आम्ही पाठिशी मजबूत उभे आहोत,ठाकरे सरकार स्थिर आहे : शरद पवार

Sharad Pawar & Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या संकटात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. तर सत्ताधारी देखील आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देत आहेत.

एकीकडे कोरोना, लॉकडाऊन, रेड झोन, नियम-अटी या सगळ्या धबडग्यात राज्यातली जनता व्यस्त असताना दुसरीकडे राज्यात लवकरच एक राजकीय भूकंप होईल का? अशा प्रकारच्या चर्चांना उधान आल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकार निष्क्रीय असल्याचे होणारे आरोप , केंद्रात सत्तेत आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून राज्यात केलेले सरकारविरोधी आंदोलन , केंद्रसरकार व राज्यसरकार यांच्यात समन्वय नसल्याचे निर्माण झालेले चित्र ,सरकारच्या कारभाराबाबत सातत्याने राज्यातील विरोधीपक्ष नेत्यांनी राज्यपालांची घेतलेली भेट, याच बरोबर संजय राऊत, शरद पवारांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीचे अनेक तर्कविर्तक काढले जात आहेत.

कौतुकास्पद : साध्या पध्दतीने विवाह करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली ५१ हजार रुपयाची मदत !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी यातून केंद्रात याबाबत काही पडद्द्यामागून खलबते तर चालू नाहीत ना? याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. या कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं, यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दरमहा 1 हजार रुपये टाकावे : अर्थतज्ञ बॅनर्जी

राज्यपालांच्या भेटीसंदर्भात ते म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असं राज्यपाल काल म्हणाले, असंही पवार यांनी सांगितलं.

दरम्यान,कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार निष्क्रिय आहे, असा आरोप भाजप वारंवार करत आहे. मात्र भाजपच्या या आरोपाचा कोणताच परिणाम आम्हाला होत नसल्याचं सत्ताधारी दाखवत आहेत. उलट भाजप या संकटात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

फुकटचा पैसा कोणी देत असेल तर घ्या; काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला