खरं बोललो की किती त्रास होते हे आम्हालाच माहिती : इंदुरीकर महाराज

टीम महाराष्ट्र देशा : आज पुण्यातील कोथरूडमध्ये ते तुळजाभवनी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात निवृत्तीनाथ देशमुख अर्थात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.त्यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले की ‘खरं बोललो की किती त्रास होते हे आम्हालाच माहिती अशा शब्दात मागील काही दिवसांपासून असणाऱ्या वादावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

कीर्तनात पुढे ते म्हणाले की, ‘जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही.सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये. ज्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असते आणि ज्याची धर्मावर निष्ठा असते ती व्यक्ती कायम सुखी असते.

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होणार हे निश्चित होते. मात्र या गर्दीतून कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून कीर्तनाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.