पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात पहावं लागेल- संजय राऊत

raut-modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ वा वाढदिवस आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने भाजपने देशातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षातील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील मोदींवर वेगवेगळ्या अंदाजात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या अनोख्या अंदाजात चिमटा काढत तसेच मोदींचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोदींना शुभेच्छा देत ते म्हणाले की,’मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभले. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेले. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ‘मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही’ असेही राऊत म्हणाले. तसेच ‘संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावं लागेल. पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असे वाटते’ असे म्हणत काहीशी तिखट टीकाही राऊतांनी केली आहे.