‘दुबईच्या गुन्हेगारालाही न घाबरणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचे रक्त आमच्या अंगात’, पंकजा यांनी राष्ट्रवादीला सुनावले

बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून नुकतेच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता घणाघात केला होता. बीडमध्ये अनेक अवैध धंदे वाढत आहेत. खून, दरोडे आणि महिला अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. तरी देखील जिल्ह्यातील गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, असा आरोप पंकजा यांनी केला. बीड जिल्ह्यातील बोकाळलेला माफिया राज बंद करावा, पण या माफिया राजला सत्तेत बसलेल्या लोकांचा पाठिंबा असल्याची टीका देखील त्यांनी केली होती.

यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांनी धनंजय यांचे नाव घेता घणाघाती टीका केली आहे. ‘बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता, कृपया पालकमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका. मी दुर्गाष्टमी निमित्त सांगते, माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. चांगले दिवस परत आणण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतोय. आम्ही लढायला पाय रोवून उभे आहोत. मुंडे साहेबांनी दुबईच्या गुन्हेगाराला घाबरले नाही, त्या मुंडे साहेबांचं रक्त आमच्या अंगात आहे. दसऱ्याच्या आधी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे’, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंसह ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

त्या म्हणाल्या, ‘आता पक्षात येतो का अन्यथा बघू तुला , तुझ्यावर केस करतो अशा धमक्या काही जण देत आहेत. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, अशी टीकाही पंकजा यांनी केली. सत्ताधारी माफिया राज चालवित आहेत, सत्ता प्रस्थापित होऊन दोन वर्षे होत आले, यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही जनतेसाठी यांना सवलत दिली. समाजाचं कल्याण करण्याचं मंत्रिपद मिळाले. पण आम्ही रेमडेसिव्हीरचा काळाबाजार डोळ्यांनी पाहिला, आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगत पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

महत्त्वाच्या बातम्या