उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना भीत नाही, त्यांचे सातबारे माझ्याकडे; भाजप नेत्याचा दावा

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्या नोटाबंदीमुळे चांगले असे दुरगामी परिणाम झाले आहेत. या नोटाबंदीमुळे शासनाला करोडो रुपयांचा फायदा झाला असून 56 लाख नव्या करदात्यांची भर पडली आहे, असा दावा भाजपच्या वतीने दीपक पवार यांनी केला.

दरम्यान, त्यांना साता-यातील टोलनाक्यावरुन झालेल्या राडाप्रकरणी छेडले असता त्यावर सुरुवातीला बोलणे टाळले. मीडियाने खोदून खोदून विचारल्यानंतर ऑफ दी रेकॉर्ड बोलताना म्हणाले, मी दोन्हीही राजांना घाबरत नाही. येत्या आठ दिवसात दोघांबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असून ते जाहीर पत्रकार परिषदेत सांगेन, याची बातमी तेवढी करु नका, अशी विनंतीही त्यांनी केल्याच वृत्त हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेने दिले आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दीपक पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा गतवर्षी केली. या नोटाबंदीमुळे एका वर्षात शासनाला करोडो रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच 56 लाख नव्या करदात्यांची भर पडली. 9 टक्के आयकर रिटर्न भरला जात होता, आता त्यामध्ये वाढ होऊन 24.7 टक्के एवढी वाढली आहे. वैयक्तिक करदाते 41.78 टक्क्यांनी झाली आहे. संशयास्पद अशा 18 लाख खाती बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत पैसा जमा झाला. बँकांच्या ठेवी वाढल्या आहेत. कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आला. कामगारांसाठी भरीव तरतूद करण्यात आली.

विरोधी पक्ष काहीही बरळत असले तरीही शासनालाच याचा फायदा झाला आहे. भाजप हेच सक्षमपणे सरकार चालवत आहे. 19 योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. विरोधकांकडून नोटाबंदीबाबत जे उठवले जात आहे. ते साफ चुकीचे आहे, असा दावा भाजपच्यावतीने पवार यांनी केला.

साता-यातील टोलनाक्यावरुन झालेल्या वादांबाबत मीडियाने सवाल केला असता दीपक पवारांनी स्पष्टच शब्दांत त्यासाठी वेळ आल्यावर बोलू, मी आता बोलणार नाही, असे वांरवार सांगत होते. अनेकदा विनवणी केल्यानंतर त्यांनी ऑफ दी रेकॉर्ड म्हणून सातारकरांना माहिती आहे. मी दोन्ही राजांनाही भित नाही. माझ्याकडे दोघांचे सातबारे आहेत. येत्या आठवडयात मीडियाची वेळ घेऊन दोघांबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे, असे सांगत पुन्हा हे छापण्यासाठी नाही म्हणून बिचकल्याचे स्पष्ट झाले. तसेच स्थानिक नगरसेवकांवर सत्ताधा-यांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत विचारणा केली असता, मंजूर झालेला निधी मिळणार आहे. परंतु, तो कसा द्यायचा यावर अजूनही स्पष्ट झाले नाही, लवकरच स्पष्ट करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...