भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल

usmanbad

उस्मानाबाद : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. तर, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याचा आढावा दौरा करणार आहेत.

लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे मनोबल वाढवताना शरद पवार म्हणाले, १९९३च्या भूकंपात या भागातील हजारो जीव गेले. हे दु:ख विसरुन आपण उभे राहिलो आहोत. त्याचप्रमाणे याही संकटातून उभे राहू, तुम्ही धीर धरा, आपण नक्की मार्ग काढू, असा शब्द पवारांनी शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण जमीनच खरवडून गेल्याचे अनेक ठिकाणी दिसले. हे नुकसान एका दिवसात भरुन येणारे नाही. मात्र, मदतीसाठी राज्य सरकारला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्रानेही मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती उस्मानाबादसोबतच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. परंतु, नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता एकटे राज्य सरकार पुरणार नाही. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन याविषयी चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

महत्वाच्या बातम्या-