‘आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो’ शहराच्या नामांतरावरुन ‘औरंगाबादकरांच्या’ प्रतिक्रिया

aurangabad

औरंगाबाद/अतिक शेख : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील निर्माणाधीन ‘मुघल संग्रहालया’चं नामांतर करून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ संग्रहालय केल्यानंतर मुख्यमंत्री योगींचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधा वेळ मिळाला नाही हे आपलं ‘दुर्दैव’च म्हणावं लागेल. कदाचित त्यांच्या अभिनंदन न करण्यामागे ‘संभाजीनगर’चे कारण असू शकते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा अपयशी ठरल्यानंतर शिवसेनेने मराठवाड्याची राजधानी असलेल्या आणि मुघल राजा औरंगजेबच्या नावाने नाव पडलेल्या ‘औरंगाबाद’ शहराचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या नावावर म्हणजेच ‘संभाजीनगर’ करण्यात यावं या मागणीवर शिवसेनेने मराठवाड्यात बरीच वर्ष राजकारण करुन आपली पाळंमुळं घट्ट बसवण्यासाठीच प्रयत्न केले.

शिवसेनेच्या ‘या’ मागणीला मराठवाड्यातील जनतेने प्रचंड प्रतिसाद देखील दिला पण आता मागे वळून पाहताना ‘आम्ही मराठवाडेकर उगाचच एवढी वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो’ अशी भावना आता मराठवाड्यात व्यक्त केली जात आहे. मागील दशकापासून शिवसेना औरंगाबाद महानगरपालिकेत सत्तेत आहे. या काळात शिवसेनेने किती वेळा शहराच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला? चला ते सोडा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर मागच्या पाच वर्षात सत्तेत सहभागी होती, कधी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला?

हे ही सोडा आता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सरकार शिवसेनेचे आहे. आता यालाही जवळपास एक वर्ष पूर्ण होईल मग शिवसेनेने का नाही शहराचे नामांतरण केले? एवढी वर्ष औरंगाबाद महापालिकेत सत्ता असताना, 20 वर्ष जिल्ह्याचा खासदार शिवसेनेचा असताना आणि मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असताना शिवसेनेने ‘औरंगाबाद’ साठी काय केले? शिवसेनेच्या घोषणांवर आणि विचारधारेवर मराठवाड्यातील अनेक तरण्या पोरांनी आयुष्य खर्ची केलं आहे. शिवसेनेने त्यांच्या हाती काम तरी दिले आहे का? का ही फक्त आश्वासने आणि निव्वळ घोषणा होत्या?

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने महाराष्ट्राचे आराध्यदैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा वसा व वारसा सांगितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले पण आचरण मात्र शून्य? मुंबईतील ‘शिवसेना भवना’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली ‘छत्रपती शिवाजी महाराजां’चा फोटो का आहे? याचं उत्तर शिवसेना कधी देणार? की छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण शिवसेनेला फक्त निवडणुकीपूरतीच येते? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी संग्रहालयाचे नामांतरण केल्यानंतर शिवसेना औरंगाबादचे नामांतरण कधी करणार आहे?

उत्तर प्रदेशात तिथले मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतात आणि आपल्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागतात हे महाराष्ट्राचं दुर्दैवचं म्हणावं लागेल. मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेने मुका मोर्चा असे संबोधले होते. मराठे यामुळे नाराज झाले, त्यातच आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त जाहिरातीत शिवाजी महाराजांना शेवटचे स्थान दिले.

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा मधील कार्यकर्त्यांला आमदार अंबादास दानवे यांनी मारहाण केली होती. या राजकारण्यांंसोबत महाराजांची बरोबरी होऊ शकणार नाही. शिवाजी महाराज यांचा  शिवसेना फक्त राजकारणासाठी उपयोग करते का या निमिताने हा प्रश्न उपस्थित होतो. निवडणूक आली कि शिवसेनेचे हिंदुत्व, शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम समोर येते. शिवसेनेवर संकट आले कि मराठी अस्मिता असे मुद्दे काढले जातात.

शिवसेनेने आजपर्यंतच्या राजकारणात छत्रपतींचा फक्त मतांसाठी वापर केला. ‘पिते दुध मिटुनी डोळे जात मांजराची’ असं जर शिवसेना डोळे मिटून दुध पित असेल तर जनतेसमोर या गोष्टी एक दिवस येणारच आहे आणि तेव्हा होणाऱ्या ‘वाताहती’ला वाचवण्यासाठी हिंदुहृदयसम्राट नसतील.

महत्वाच्या बातम्या :-