आम्हाला बाहेरच्या व्यक्तिंची गुलामी नको : विजय औटींची निलेश लंकेंवर टीका!

lanke

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- माझ्याकडे गमावण्यासारखे काही राहिलेले नाही. कमवले तर काहीचं नाही. जे वैभव तुम्ही दिले होते ते तुमच्यासाठी खर्च केले आहे. माझा प्लॉट पुण्यात दाखवा, मुंबईत दाखवा, फ्लॅट दाखवा, शेती दाखवा. मी पारनेर तालुक्याचा आमदार असताना तसेच नगरपंचायतच्या माध्यमातून पारनेर शहराचा तसेच तालुक्याचा चेहरामोहरा बदलला असुन आगामी नगरपंचायती निवडणुकीत पारनेर शहवासीयांनी आपला स्वाभिमान जपवा असे भावनिक आवाहन माजी आमदार विजय औटी यांनी केले आहे.

ब्रिटीश भारतात चहा विक्रीसाठी आले आणि दिडशे वर्षे राज्य करून गेले. त्यांची गुलामगिरी आपल्याला स्विकारावी लागली. गुलामगिरी कुणाचीच स्विकारायची नाही. बाहेरून येउन कोणी आमचा विकास करण्याची गरज आहे, असे मला स्वत:ला वाटत नाही. आमचा विकास करायला आम्ही शंभर टक्के समर्थ आहोत.

घराघरातील दु:ख आम्हाला माहीत आहे, असे सांगत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी पारनेरकरांना भावनिक साद घालत आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टिकास्त्र सोडले. शहरविकास आघाडीचे चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांनाही त्यांनी चिमटे घेत त्यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न केला.

आपण पारनेर शहराचा केलेला बदल जनतेपुढे आहे. या निवडणुकीत आपण सर्व १७ जागा जिंकू असा विश्वास औटी यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात विद्यमान आमदारांचा एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का? असा सवालही माजी आमदार औटी यांनी केला.

दरम्यान अद्याप पारनेर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली नसताना राजकीय फटाके फोडण्यास सुरूवात झाली आहे. यावरूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार यात शंकाच नाही. उमेदवारांपेक्षा माजी आमदार औटी व आमदार लंके यांच्या भोवतीच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या