‘ईडी’ने पाठवलेल्या प्रेमपत्राला आम्ही भिक घालत नाही : शर्मिला ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीची नोटीस आली आहे. मुंबईतील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी राज यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडल्याने मनसे आक्रमक झाली आहे. यावर शर्मिला ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ईडीचे आमच्यावर प्रेम आहे. म्हणून आम्हाला नोटीस पाठवण्यात आली. मात्र असल्या नोटीसला भिक घालत नाही, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्याचमुळे आम्हाला ईडीची नोटीस आली. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे. सध्या नोकऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे पुरुषांनाही गृहद्योग करण्याची वेळ आली आहे असाही टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात टाकले जात आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चाल आहे अशी प्रतिक्रिया मनसेकडून दिली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.