रामदास कदमांना आम्ही ‘दाम’दास कदम म्हणतो – धनंजय मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजप सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे.रायगडावरून सुरु झालेल्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्यतील खेड या ठिकाणी झालेल्या सभेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली.तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याच्या चर्चेवरून रामदास कदमांना आम्ही ‘दाम’दास कदम म्हणत असल्याचे यावेळी मुंडे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे ?

आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. असं ऐकलंय की, सेनेच्या मंत्र्याचे सुपूत्र निवडणूकीला उभे राहतायत. ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो. ज्या कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलं, त्या शिवसेनेनं कोकणी माणसाला काय दिलं? केंद्रात सेनेचा उद्योग मंत्री असताना कोकणात एकही प्रकल्प आला नाही. राज्यातही त्यांचाच उद्योग मंत्री असताना त्यांचे काय उद्योग सुरू आहे तर फक्त भूसंपादनातून शेतकऱ्यांची अडवणूक आणि लूट.

निवडणुकांच्या तोंडावर या सरकारला वाटतंय की जीएसटीत बदल करावा, दहा टक्के आरक्षण द्यावं. मोदींनी एवढा अभ्यास केला तरी कधी? २०१४मध्ये ५० रूपयाला मिळणाऱ्या पेट्रॉलने ८० रूपयांचा टप्पा पार केला. तुम्हीच हिशोब लावा. मग सरकारकडून झालेली लूट लक्षात येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले.