fbpx

कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत अद्याप आघाडी नाही: राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: हातकणंगले मतदार संघाचे खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस आणि साष्ट्रावादीसोबत अद्याप आघाडी झालेली नाही असं वक्तव्य केलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आम्ही मान्य करू असं भाजपने आश्वासन दिले होते. ते भाजपने पूर्ण केलं नाही त्यांनी आम्हाला फसवले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतमालाला दीडपट हमीभाव देणे, या आणि इतर अनेक प्रमुख मागण्या मान्य केल्या तर आम्ही आघाडीशी चर्चा करू नाहीतर आम्ही स्वबळावर लढू असं राजू शेट्टी म्हणाले. राजकारण आमचा धंदा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढा देणार आहोत आणि भाजपचे कमळ मुळापासून उपटून काढण्याची ताकद आमच्यात आहे असही राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही होती, परंतु राष्ट्रवादीने बुलढाण्यात उमेदवार दिला आहे. सांगलीची जागा कॉंग्रेसकडून स्वाभिमानीला सोडण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजू शेट्टी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.