आम्ही सुडाचे राजकारण करत नाही – रामराजे नाईक निंबाळकर

दुधेबावी, (ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सातारा  : सर्वसामान्य माणूस चिडतो तेव्हा कोणीच काही करू शकत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत दुधेबावीत आपण कुठे कमी पडलो, याचा शोध घ्या. दुधेबावी गावाने आमच्या राजकारणाची सुरुवात करून दिली. 1995 पासून गावाने आमच्या कुटुंबावर प्रेम केले आहे. ते प्रेम तोडू नका. आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. गावातील कोणत्याही कार्यकर्त्याला अडचण आल्यास थेट मला भेटावे, असे आवाहन रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.दुधेबावी, (ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामराजे पुढे म्हणाले, दुधेबावी गावाने संजीवराजे यांच्यासह राजे कुटुंबाला आजपर्यंत निवडून दिले. पण गाव विरोधात जाते तेव्हा लोकांवर राग काढून उपयोग नाही. सर्वसामान्य माणूस चिडतो तेव्हा कोणी काही करू शकत नाही. तालुक्यातील धोमबलकवडीच्या पाण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याचा फायदा भविष्यात बहुतांशी गावांना होणार आहे.