शिवस्मारक बांधतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय; विनोद तावडे आक्रमक!

विरोधकांनी केली वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी

मुंबई: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आज महाराष्ट्राच्या अधिवेशनात शिवस्मारकाच्या उंचीच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु झाला.

सरकार शिवस्मारकाची उंची कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे आक्रमक झाले.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा मुद्दा आज अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच लावून धरला. यावर विनोद तावडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही स्मारक करतोय म्हणून यांच्या पोटात दुखतंय. यांनी महाराजांच्या स्मारकासाठी काही केलं नाही. जाऊन उंची मोजून या. उद्या या विषयावर चर्चा लावा, आज कामकाज चालवा, असं तावडे म्हणाले. यानंतर विरोधक आणि तावडे आमने सामने आले. विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर सत्ताधारीही वेलमध्ये उतरले.