आम्ही भाष्य करायला सुद्धा घाबरतो – मधुर भांडारकर

पुणे : चित्रपटसृष्टी कोणाची नसते. चित्रपटाला विरोध होत असेल तर त्यावेळी आपल्या सोबत चित्रपट सृष्टीमधील कोणी नसते. वाद होणे काही नवीन राहिले नाही. ‘इंदू सरकार’ या माझ्या चित्रपटाच्या वेळी सुद्धा वाद झाले. १९८७ मध्ये ‘पती परमेश्वर’ या चित्रपटाच्यावेळी सुद्धा असेच झाले होते. चित्रपटसृष्टीमधील लोक वादाला घाबरतात. फक्त चित्रपटच नाही तर आम्ही सोशल मीडियावर भाष्य करायला सुद्धा घाबरतो, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केले.

आशय फिल्म क्लबतर्फे ८व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संजय डावरा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मधुर भांडारकर म्हणाले, मी चित्रपट बजेट मध्ये बनवतो. त्यात मला यश देखील मिळाले आहे. आपल्या समाजात स्त्रीप्रधान विषय अनेक आहेत, त्यांवर चित्रपट बनायला हवे.

दिग्दर्शक हा सुरुवातीपासून चित्रपटाला पुढे नेत असतो. वेषभूषेपासून अभिनयापर्यंत सगळीकडे दिग्दर्शकाचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे, कलाकाराला दिग्दर्शकावर विश्वास असायला हवा. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्याला वाटायला हवे, की या विषयावर चित्रपट बनू शकतो. त्याची जाण आपल्याला असायला हवी. चित्रपटसृष्टीत यायचे असेल तर आपले शिक्षण पूर्ण करून यावे.