वाझे शिवसेनेचा माणूस असून सरकारवर आरोप करतो म्हणजे ते सत्य असेल – आठवले

ramdas athawale

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्या आरोपांवर देखील भाष्य केलं आहे.

‘2 कोटी, 50 कोटी, 100 कोटी हे आकडे पाहता महाराष्ट्र सरकारमध्ये मोठा भष्टाचार असल्याचं दिसतं आहे. अनिल परब म्हणतात यात भाजपचा हात आहे, पण वाझे शिवसेनेत होते. जे काही आरोप केलेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. भाजप काही वदवून घेऊ शकत नाही. वाझे शिवसेनेचा माणूस असून सरकारवर आरोप करतो म्हणजे ते सत्य असले पाहिजे,’ असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :