उजनीतून १० जानेवारीनंतर पाणी सोडण्यात येणार

सोलापूर  – सोलापूर शहराला २० जानेवारीपर्यंत पुरेल इतके पाणी चिंचपूर बंधाऱ्यात आहे. तसेच १० जानेवारीनंतर उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सणासुदीला शहराला पाणी कमी पडणार नाही, असा दावा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केला. देशमुख म्हणाले की, पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

उजनी धरणात सध्या १०४ टक्के पाणी साठा आहे. उजनीतील उपलब्ध पाण्याचे पुढील दोन वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील वर्षी जरी पाऊस झाला नाही तरी शेतीला आणि पिण्याला पाणी कमी पडू नये, असे नियोजन करण्यात येत आहे. उजनी भरलेले आहे म्हणून कधीही पाणी सोडले जाणार नाही. नियोजनानुसारच पाणी सोडले जाणार आहे. शहरवासियांना पाण्याची कमतरता होणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे.

सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी पालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे आणि उजनी लाभ क्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले हे सतत संपर्कात आहेत. तसेच रोजच्या रोज पाणीपुरवठ्याची माहिती घेत आहे.