दुष्काळाची दाहकता ; मनमाडमध्ये चक्क ३०० लिटर पाणी चोरीला

टीम महाराष्ट्र देशा : मध्यरात्रीचा फायदा घेत चोर -दरोडेखोरांनी आजपर्यंत रोख रक्कम, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू चोरून नेल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र मनमाड शहरात मध्यरात्रीचा फायदा घेत चक्क पाणी चोरल्याची घटना पाहायला मिळाली आहे. या संदर्भात मनमाड शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यात दुष्काळाची परिस्थती आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. त्यामध्ये मनमाड शहराचा समावेश होते. शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्यामुळे मनमाड शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पालिकेतर्फे २२ ते २५ दिवसाआड पाणी पुरावठा करण्यात येत आहे. एकदा पाणी आल्यानंतर तब्बल एक महिना ते  पाणी जपून ठेवावे लागते. त्यामुळे घरात असलेल्या लहान भांड्यांपासून ते मोठ्या भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवावे लागते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात पालिकेतर्फे पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी श्रावस्ती नगर भागातिल रहिवाशी सामाजीक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी घराच्या छतावर असलेल्या टाकीत पाणी भरून ठेवले होते. सकाळी घरात असलेल्या नळातून पाणी येत नसल्याचे पाहता त्यांनी छतावर जाऊन टाकी पहिली त्यावेळी टाकीत भरलेले पाणी चोरीला गेल्याचे त्यांना कळाले. मध्यरात्रीचा फायदा घेत चोरट्यांनी ५०० पैकी ३०० लिटर पाणी चोरले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या भीषण पाणी टंचाईत त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्याची राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

विशेष म्हणजे, या संदर्भात त्यांनी मनमाड शहर पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दिली आहे. नगरपालिकेतर्फे नळाद्वारे देण्यात आलेले पाणी मी टाकीत साठवून ठेवले होते मात्र चोरट्यांनी ३०० लिटर पाणी चोरून नेल्यामुळे माझ्या कुटुंबियावर भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पाणी चोरांचा शोध घेण्यात यावा. अशी मागणी अहिरे यांनी केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

अहिरे यांच्या घराचा जिना बाहेरील बाजूने असल्या कारणाने त्यांच्या घराच्या छतावर ये-जा करणे सोपे आहे. याचाच फायदा घेत चोरांनी पाणी चोरले आहे.