fbpx

पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुळशी, पवना, डिंभे, चासकमान या सारख्या धरणांमधून विसर्ग ही सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विशेष घाट माथ्यावर आज सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात ही झपाट्याने वाढ होत आहे.

पानशेत खोऱ्यात तर आज दिवसभरात तब्बल ५६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या पानशेत धरणामधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या धरणातून सध्या ३ हजार क्‍युसेक्‍सने विसर्ग सुरु आहे. त्याचबरोबर वरसगाव धरण सुध्दा आता ९० टक्के भरले आहे.

आज या परिसरात सुध्दा तब्बल ५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. टेमघराच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ८९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या या धरणामध्ये ४० टक्के पाणीसाठा जमा आहे. मुळशी धरण हे शंभर टक्के भरले आहे. त्यातच आज सकाळपासून धरण परिसरात पाऊस सुरु झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

या धरणामधून तब्बल २५ हजार क्‍युसेक्‍सने पाणी सोडण्यात येत आहे. या धरण परिसरात आज दिवसभरात तब्बल ६४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. याशिवाय सध्या डिंभे, चासकमान आणि धोम वडज या धरणांमधून ही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. आज अखेरपर्यत या धरणामध्ये ३६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.