नियोजनशून्यतेमुळे पुण्याची पाणी कपात, खा संजय काकडेंचा पालकमंत्र्यांना घरचा आहेर

sanjay-kakde

पुणे: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना देखील पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट कोसळणार आहे. याच मुद्यावरून सध्या विरोधी पक्षांकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना टार्गेट केलं जातं आहे. तसेच पाणी प्रश्नावरून शहरभर लावण्यात आलेले बॅनर देखील सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, शहरात नियोजन शून्यता असल्यानेच पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आल्याचं म्हणत भाजपचे सहयोगी खा संजय काकडे यांनी पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.

मागील काही दिवसांपासून पाणी संकट झेलणाऱ्या पुणेकरांकर आता पाणी कपातीचे संकट येणार आहे. दुष्काळामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पाणी कपात करण्याचा निर्णय बापट यांनी गुरुवारी घोषित केला. याच मुद्द्यावरून माजी पालकमंत्री अजित पवार यांचे गुणगान गाणारे, तर विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांना टोमणा मारणारे फ्लेक्स संपूर्ण पुणे शहरात लावण्यात आले आहेत.

काय रे गिरीश, दुष्काळ असताना सुद्धा अजितने कधी पाणी कमी पडुन दिले नाही! तू तर आपल्या शहरातलाचं ना! पाणी कुठे मुरतय…. एक त्रस्त पुणेकर. अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याच पुणेरी फ्लेक्सची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

दरम्यान, पाणी कपातीवरून लावण्यात आलेल्या बोर्डवर आजी-माजी पालकमंत्र्यांच्या एकेरी उल्लेख करण्यात आल्याने खा काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांनी दोन्ही नेत्यांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. कधीकधी माझ्या घरातही पाणी येत नाही. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज आहे. पण तसं होताना दिसत नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुण्याच्या पाणी प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केल्याचं काकडे यांनी सांगितले.