‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’

‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’

Nitin Gadkari

वर्धा : पुराच्या पाण्यामुळे धाम नदी तसेच मोती नाला या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होत होते. परंतु ही समस्या आता नाला रुंदीकरण व खोलीकरण यामुळे उद्भवत नसून या ठिकाणी झालेल्या जलसंधारणामुळे सुमारे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली असून 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याची माहिती केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल वर्धा येथे पत्रकार परिषदेत दिली.

नितीन गडकरी वर्धा जिल्ह्यातील जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी करण्याकरता एक दिवसाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ही माहिती दिली.वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील येळाकेळी गावच्या धामनदीच्या 26 किलोमीटर लांबीच्या तसेच मांडवा येथील मोती नाल्याच्या 9 किलोमीटर लांबीच्या जलसंधारणाचे कार्य चालू आहे. यातील धाम नदीच्या जलसंधारणाच्या कार्याला जमनालाल बजाज फाउंडेशनने सहकार्य केले असून मोती नाला येथील जलसंधारणाच्या कार्याला जवाहरलाल नेहरू पोर्टच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळत आहे. अशा प्रकारचे कमी खर्चात तसेच पर्यावरणीयदृष्ट्या सक्षम असे प्रकल्प गावागावात उभारले तर कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही असा आशावाद गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी वर्ध्याचे खासदार रामदास तडस, पुर्ती सिंचन संस्थेचे माधव कोटस्थाने उपस्थित होते.वर्धा जिल्ह्यात तामसवाडा नाला खोलीकरणाने नदीचे पात्र रुंद झाले आणि पाणीसाठा पूर्वीप्रमाणे होऊन नदीचा प्रवाह पूर्ववत झाला हा पॅटर्न ‘तामसवाडा पॅटर्न ‘ म्हणून प्रसिद्ध झाला. अशाच पॅटर्नच्या आधारे वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील मोतीनाला जलसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून मृतप्राय अशा मोती नाल्याचे पुनरुज्जीवन करण्याकरिता नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळाले . तीन टप्प्यात सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा पूर्ती सिंचन समृद्धी संस्था आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे सुमारे 9 किलोमीटर लांबीचा मुख्य मोती नाल्यावर जलसंवर्धनाचे कार्य करण्यात आले असून या प्रकल्पामध्ये सुमारे 280 घन मिलिलिटर जलसाठा प्रति वर्ष होत आहे. त्यामुळे सुमारे 600 एकर शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून शेतीपूरक व्यवसायात सुद्धा वाढ झाली आहे.

या प्रकल्पाकरिता पूर्ती सिंचन समृद्धी व कल्याणकारी संस्थेचे दत्ता जामदार, माधव कोटस्थाने, सद्भावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलिंद भगत तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी यांची मोलाची साथ लाभली आहे. या मोती नाल्याची पाहणी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडवा येथील जन सभेला संबोधित केले. सोयाबीन कापूस यासारख्या पिकाऐवजी या परिसरातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी. फळशेतीसाठी ‘वन ड्राप मोअर क्रॉप’ या तत्वाद्वारे ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी . तामसवाडा पॅटर्ननुळे या परिसरात जलसंवर्धन झाले असून इथे एकही शेतकरी आत्महत्या होवू नये अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या