मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का , धर्माबाद न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट जारी

टीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात धर्माबाद इथल्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध 2010 साली गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे प्रकरण आता धर्माबादमधील कनिष्ठ स्तर न्यायालयात पोहोचलं आहे. सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने नायडूंविरोधात हे वॉरंट जारी केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशमध्ये विरोधात असतांना 2010 मध्ये त्यांनी बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर त्यांनी जामीन नाकारला होता. पण नंतर नायडूंची सूटका करण्यात आली होती. नायडू यांच्यावर या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्त्राद्वारे इजा पोहचवणे, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता धर्माबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची मध्यरात्री तुरुंगातून सुटका