सावधान : मुंबई, कोकणासह पुण्यात काही तासात मुसळधार पावसाचा इशारा

mumbai

पुणे : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असणार आहेत. येत्या 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान आज सकाळपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP