उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला वारकरी पाईक संघाचा विरोध !

ajit pawar wari

पंढरपूर : कार्तिकी यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातल्याने वारकरी महाराज मंडळींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्तिकीसाठी वारकऱ्यांना बंदी असेल तर आमचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध राहील, अशी ठाम भूमिका वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी आज येथे मांडली.

कार्तिकी यात्रेच्या तोंडावर प्रशासनाने संचारबंदीसह इतर काही निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात आज (शनिवारी) पुढील दिशा ठरवण्यासाठी येथील वासकर महाराज मठात वारकरी पाईक संघाची बैठक पार पडली. त्यानंतर वासकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध असल्याचे स्पष्ट केले. प्रतिकात्मक पद्धतीने वारी होणार असेल तर शासकीय महापूजा देखील पंढरपुरातील शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वारीसंदर्भात शासनाकडे एक प्रस्ताव दिला होता; परंतु त्या प्रस्तावावर देखील कोणतीच चर्चा केली नाही. प्रशासनाने वारकरी संप्रदायाला विचारात न घेता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचेही श्री. वासकर महाराज यांनी सांगितले.

या वेळी भागवत महाराज चवरे, विष्णू महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापूरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उखळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या