या शिक्षण संस्थेत होत आहे विद्यार्थ्यांची गळचेपी

पुणे : कर्वे समाजसेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शुल्कवाढीविरोधातील आंदोलनाचा राग मनात धरून व्यवस्थापनाने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याचा प्रकार घडला आहे. त्याच्या निषेधार्थ संस्थेच्या आवारात ठिय्या मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना वारजे पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. विद्यार्थी शांततेत निषेध करत असतांना देखील पोलीसांची अचानक नोटीस आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्वे समाजसेवा संस्थेने काही दिवसांपूर्वी शुल्कवाढ केली होती. त्याच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. तसेच, कुलगुरूंची भेट घेऊन संस्थेने केलेली शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर कुलगुरूंनी ही शुल्कवाढ रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु व्यवस्थापनाने त्याचा राग मनात धरून विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्यास सांगितले. त्यामुळे विद्यार्थी संस्थेच्या आवारातच आंदोलन न करता दिवसरात्र तेथेच थांबून निषेध करत आहेत. संस्थेने विद्यार्थी करत असलेल्या निषेधाचे कोणतेही पत्र न स्विकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच बसून राहण्याचा निर्धार केला आहे. परिणामी, संस्थेने विद्यार्थी करत असलेला निषेध विनापरवानगी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्यांना बोलावून घेऊन नोटीसा बजावल्या आहे.

आम्ही संस्थेचा करत असलेल्या निषेधाला हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांनी आम्हाला एक नोटिस दिली आहे. पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी दिलेल्या नोटिसचा आम्ही सन्मान करतो.
नेहा राणे, विद्यार्थिनी