‘हे’ पण आम्हीच केले… औरंगाबादमध्ये रंगली सेना-काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई

congress - shivsena

औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेस व शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु आहे. गुंठेवारी नियमित करण्याचे स्वागत करत शिवसेनेने शहरात पोस्टर झळकवले आहे. मात्र, काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळेच महाविकास आघाडी सरकारने गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेस शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी केला आहे.

हिशाम म्हणाले, २००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर हा विषय थंड बस्त्यात पडला. आघाडीचे सरकार येताच आम्ही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी लावून धरली. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

यावेळी त्यांनी पर्यटनासाठी पाणचक्की-मकबरा-औरंगाबाद लेणी हा टुरिझम कॉरिडॉर म्हणून विकसित करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेरोजगारांना दुकाने द्यावीत, पैठण गेट-गुलमंडी-सिटी चौक आणि मछली खडक ते कुंभारवाडा हे रस्ते ऐतिहासिक शैलीत विकसित करावे. यावर लायटिंग, पेव्हर ब्लॉक आणि दुतर्फा झाडे लावावीत. रस्ते वाहतूकमुक्त करावेत.

यासह शहागंजमध्ये वल्लभभाई पटेल यांचा पुतळा २ वर्षांपासून झाकलेला आहे. त्याचे तात्काळ अनावरण करून बागेचे सुशोभीकरण करावे, त्यास पटेल यांचे नाव देऊन याठिकाणी सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुुगदिया, अल्पसंख्याक आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, काँग्रेसच्या पर्यावरण आघाडीचे अध्यक्ष एम.ए.अझहर आदींची उपस्थिती हाेती.

महत्वाच्या बातम्या