मुंडे भाऊबहिणीचा वाद टोकाला

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात विधान परिषदेतील प्रश्नाबाबतच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वाद विकोपाला गेला आहे. या आरोपांमुळे व्यथित झालेले धनंजय मुंडे यांनी दररोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीडी सभागृहात सादर करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. याची सुरवात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे याच्या स्वीय सहाय्यकावरील आरोपांबाबतची एक सीडी सादर करत धनंजय मुंडेंनी केली आहे. त्यामुळे मुंडे भावंडामधील वाद पुन्हा पेटला आहे.

विधान परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांबाबत सभागृहात खुलासा करताना मुंडे यांनी आक्रमकपणे सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या तीन वर्षांत सरकारमधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने आणि काही दिवसांपूर्वी सरसघंचालकांवरही टीका केल्याने केवळ बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

यावेळी त्यांनी मंत्री आणि काही खात्यांमधील भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे सांगत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे परळीतील स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींकडून सुचवण्यात येणाऱ्या कामात पैसे मागितल्याबातची कथित ऑडिओ टेप सादर केली. त्यावर ही सीडी बनावट असून आपल्या स्वीय सहाय्यकाने त्याबाबच स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या सीडीतील आवाज कुलकर्णी यांचा नसून कोणीतरी बनावट सीडी तयार केली आहे.

यामागे कोण आहे याची चौकशी करावी म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी ही सीडी कुठून मिळाली ते सांगितल्यास प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल, असेही त्यांनी सांगितले