आधार जोडणी असूनही जातीचा दाखला मिळवण्यासाठी भटकंती

सोलापूर, : जातीचा दाखला मिळावा म्हणून ज्याला दाखला हवा अाहे, त्याने तो राहात असलेल्या ठिकाणाच्या तहसीलमध्ये अर्ज केल्यानंतर जोडलेल्या पुराव्याची प्रशासनाने खातरजमा करून घ्यायला हवी. पण सध्या तसे होत नाही. केवळ एका ५० वर्षांपूर्वीच्या पुराव्यासाठी सर्व प्रकरण ज्या ठिकाणचा पुरावा तेथे जमा करावे लागते. त्यासाठी होणारी ससेहोलपट नागरिकांना त्रासदायक अाहे. त्यामुळे दाखले देण्याच्या नियमांत बदल करणे गरजेचे झाले अाहे. अाधार लिंकिंग झाल्यामुळे अाता पुराव्यांची पडताळणी करणे एका क्लिकवर शक्य अाहे. त्याचा उपयोग करून घेता येतो.जातीचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांची, विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत अाहे. राज्य शासनाने जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेषत: अनुसूचित जातीचा दाखला पाहिजे असेल तर त्या कुटुंबाची ५० वर्षांपूर्वीची अोळख सोबत जोडणे बंधनकारक अाहे. त्या शिवाय दाखला मिळत नाही. पण हा ५० वर्षांपूर्वीचा पुरावा जोडल्यानंतर मात्र दाखला मिळवण्यासाठी मोठी भ्रमंती करावी लागते. कारण ५० वर्षांपूर्वीचा पुरावा म्हणून शाळेचा, जन्माचा दाखला जोडावा लागतो. तो ज्या ठिकाणाहून म्हणजे कोणत्या तहसील भागातील अाहे, त्या तहसीलदार कार्यालयात जाऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. मग ज्याला दाखला पाहिजे, तो जन्मापासून कुठेही राहात असो. त्याचा पुरावा जोडलेल्या दाखल्याच्या गावाचा काहीही संबंध नसो. त्या तालुक्यात जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे नाहक भ्रमंती करून वेळ, पैसा खर्च करावा लागतो. वेळेत दाखला मिळाला नाहीतर लांबच्या तहसीलमध्ये हेलपाटे मारावे लागतात. मानसिक संतुलनही बिघडू शकते. खरेतर दाखला ज्यांना पाहिजे, त्यांचे राहते ठिकाण ज्या परिसरात अाहे, त्या परिसरातील तहसीलमधून दाखला मिळवण्याची प्रक्रिया व्हायला हवी. तरच वेळ, पैसा वाचेल. मानसिक समाधानही राहील. दाखला देण्यापूर्वी ५० वर्षांपूर्वीचा पुरावा जोडलेला असेल त्या ठिकाणच्या तहसीलमधून त्याची शहानिशा करावी अन ज्या पत्त्यावर अर्जदार राहतो, त्याच परिसरातील तहसीलमधून दाखला देण्याची व्यवस्था सरकारने करायला हवी.