कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी यांनी बांधलेल्या पुलाच्या बचावासाठी खा.संभाजीराजे सरसावले

टीम महाराष्ट्र देशा : शिवाजी पुलाचे जतन व संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. लाइट अँड साऊंड शो, वॉकिंग म्युझियमद्वारे कोल्हापूरच्या संस्कृतीची ओळख जगाशी करुन देण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल अडगळीत पडू नये त्याचे संवर्धन व्हावे, कारण हा पूल कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत संस्थानच्या खर्चाने बांधलेला आहे. अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

‘परदेशात प्राचीन पुलाचे जतन केले जाते. झेक रिपब्लिकनची राजधानी प्राग येथे प्राचीन पुलाचे सुंदर पद्धतीने जतन केले आहे. शिवाजी पूल हा पुरातन वास्तू असल्याने त्याचे पर्यटन स्थळात रुपांतर करता येते. पुलावर लाइट अॅँड साऊंड शो करता येईल. या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, चौथे शिवाजी, राजर्षी शाहू महाराजांचा दैदिप्यमान इतिहास दाखवता येईल. हा शो पंचगंगा घाटावरुन पर्यटकांना पाहता येईल. पण पहिल्या टप्प्यात पुलाची डागडुजी आणि संवर्धन केले जाईल. त्यानंतर पुलावर कोल्हापूरच्या संस्कृतीचे ओळख असलेले कार्यक्रम रोज करता येतील. सामाजिक क्रांती, हरितक्रांतीच इतिहास पुलाच्या परिसरात मांडून वॉकिंग म्युझियम करता येईल. असं खासदार संभाजीराजे म्हणाले आहेत.