‘वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प जलसंपदा विभागाला पुर्ण करण्याचे आदेश जारी’

imtiaz jaleel

औरंगाबाद : वाकला – चांदेश्वर हा जलप्रकल्प अत्यंत आवश्यक व लाभार्थीयांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय झालेला असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेवुन प्रकल्प जलसंपदा विभागाकडूनच पुर्ण करुन घेण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करुन काम त्वरीत पुर्ण करण्याचे आदेश जारी केले.

वैजापूर तालुक्यातील वाकला-चांदेश्वर जलप्रकल्प तांत्रिक अडचणी व काही कारणास्तव शासनस्तरावर प्रलंबित होता. सुरवातीला सदरील महत्वपूर्ण मुळ प्रकल्प हा जलसंपदा विभागाकडूनच पुर्ण होणार होता. परंतु ६०० हेक्टर्स पेक्षा कमी सिंचनक्षमता असल्याचे कारण देवुन जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनस्तरावरुन आदेश जारी करण्यात आले होते. जलसंधारण विभागाकडे अनुभवी नसणाऱ्या मनुष्यबळाचा विचार केल्यास हा प्रकल्प सर्व्हेक्षण व बांधकामासाठी जलसंपदा विभागाकडेच ठेवणे योग्य असल्याचे सर्वांचे एकमत होते.

खासदार इम्तियाज जलील यांनी सतत तीन वर्ष यशस्वी पाठपुरावा केल्याने अखेर सदरील जलप्रकल्प जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करुन काम त्वरीत पुर्ण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाला जारी केले. सदरील जलप्रकल्प त्वरीत पुर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील कुसूमतेल, जातेगाव, वाकला, जवळकी, गोंडेगाव, चांदेश्वर व तलवाडा सह इतर गावांना पाणी पुरवठा करण्यास मदत होईल. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या विहीरीची पाणी पातळीत सुध्दा वाढ होणार असुन डोंगराळ भागातील वन्यप्राण्यांना ही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे.
वैजापुर तालुक्यातील वाकला – चांदेश्वर हा जलप्रकल्प पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने समस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे आभार मानुन आनंद व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP