भाजपमध्ये दिग्गजांच्या ‘इनकमिंग’ने वेटिंग मंत्र्यांच्या नशिबी निराशा ?

टीम महाराष्ट्र देशा : जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हे फेरबदल २३ मे ला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालांवर अवलंबून असणार आहे. यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना मंत्रीपदे दिली जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे वेटिंग वर असणाऱ्या आमदारांच्या पदरी निराशा पडणार असल्याचं चित्र आहे

भाजप मध्ये जाहीर प्रेवेश न केलेले राज्यातील ३ दिगग्ज नेते येत्या मंत्रिमंडळात विस्तारात शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या प्रवेशाने भाजप मजबूत होणार असली तरी त्यांचे इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे

राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्रीपदाची मागणी केली असून त्यांच्या पदरात कृषी खात पडणार असल्याची माहिती आहे. तर जयदत्त क्षीरसागर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे कदाचित विद्यमान मंत्र्यांना त्यांची खुर्ची सोडावी लागणार असल्याचं चित्र दिसत आहे

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे व विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनी या लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली होती. त्यामुळे या तीनही नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.