पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत, टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी – वडेट्टीवार

wadettiwar chandrakant patil

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

या निकालानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला,’ असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

आता पाटलांच्या या टीकेला कॉंग्रेस नेते व मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोला वडेट्टीवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

निवडणुकांचे योग्य नियोजन केलं असतं तर कोरोना वाढला नसता. 5 राज्याच्या निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत. इतर राज्यांनी आकडे लपवले, असंही वडेट्टीवार म्हणाले. राज्य सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये कोरोना लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी ठेवले आहेत. आता केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला किती मानतं हे पाहावं लागेल. लाखोंच्या संख्येनं रुग्ण मिळत असूनही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही? असा सवालही वडेट्टीवार यांनी केंद्राला विचारलाय.

महत्वाच्या बातम्या