‘स्वाभिमानी’ आंदोलन पेटले, कारखान्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांच्या गेटकेन विभागीय कार्यालयांवर जोरदार हल्ला चढविला. शहरातील जवाहर, दत्त व गुरूदत्त या साखर कारखान्यांच्या कार्यालयांवर कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून प्रचंड मोडतोड केली.

दत्तच्या कार्यालयांना टाळे ठोकले. शरद कारखान्याच्या कर्मचार्यांना धारेवर धरले. तोडफोड केल्याने सर्व कार्यालयांत काचा विखुरल्या होत्या. कागदपत्रे पेटविण्याचा प्रयत्न झाला. कुरूंदवाड शहरातही जवाहर, गुरूदत्त, दत्त, पंचगंगा, शरद, बेडकीहाळ या साखर कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकून सरकार व कारखानदारांचा निषेध करण्यात आला.

रविवारपासून (दि. 13) आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऊसतोडी बंद करण्यात येणार आहेत. साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करून पहिली उचल 2300 रुपये जमा केल्याने कार्यकर्ते सकाळपासून संतप्त होते.

सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदार व शासनाचा धिक्कार करीत घोषणा देत कार्यकर्ते शरद साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयात घुसले. कर्मचार्यांना कार्यालये बंद ठेवण्यास भाग पाडले. पंचगंगा विभागीय कार्यालयाचे गेट मोडून कार्यालयाच्या दरवाजावर जोपर्यंत एकरकमी एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडायचे नाही, अशी इशारावजा नोटीस लावण्यात आली.

आक्रमक कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या जवाहर कारखान्याच्या विभागीय कार्यालयावर वळविला. कर्मचार्यांना बाहेर काढून खुर्च्या, टेबल, खिडक्या, कपाटे अशा सर्व साहित्याची नासधूस केली.