फेसबुक लाईव्ह करत मतदारांनी केले मतदान, सायबर क्राईम अंतर्गत कारवाईचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीच्या कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून आज लोकसभेसाठी दुसऱ्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे. मतदान हे गोपनीय पद्धतीने पार पडत असते मात्र काही मतदान केंद्रांमध्ये काही अति शहाण्यांनी फेसबुक लाईव्ह करत मतदान करतानाचा फोटो आणि व्हिडिओ काढून उमेदवारांना पाठविला आहे. त्यामुळे हे कृत्य नियम बाह्य आणि मतदान प्रक्रियेला छेद देणारं आहे.

हा प्रकार उस्मानाबादमध्ये घडला असून प्रणव पाटील या तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आपण कोणाला मतदान करत आहोत हे जाहीर केले आहे. त्यामुळे गोपनीयता पाळली न गेल्याने या तरुणावर आता सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परभणीमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.त्यावर आता अधिकाऱ्यांकडून फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.तर सायबर क्राईम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान मतदान कोणाला करावे हा मतदाराचा निर्णय असतो. त्यामुळे या मतदान प्रकीयेची विशेष काळजी घेतली जाते.मतदाराला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी बंद खोलीमध्ये बॉक्स करून त्याठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात येतात. मात्र, मतदार जर अशी कृत्य करून या प्रकियेला छेद निर्माण करत असेल तर हे लोकशाहीला धोक्यात येऊ शकते.