राज ठाकरेंच्या भाषणामुळे मतदारांची करमणूक होते : गोपाळ शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीतून जरी माघार घेतली असली तरी, त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचाराला सुरुवत केली आहे. शनिवारी झालेल्या सभेत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. त्यामुळे भाजपतर्फेही राज ठाकरेंवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंच्या भाषणामुळे मतदारांची करमणूक होते, तसेच मीडियात टिकून राहण्यासाठी त्यांना अशा प्रकारची टीका करणे गरजेचं आहे अशा शब्दात गोपाल शेट्टी यांनी राज ठाकरेंवर तोंडसुख घेतले आहे. जर ते मोदींविरोधात बोलले नाहीत तर मिडिया त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल, ज्या कॉंग्रेसने त्यांना युतीत घेतले नाही, त्याच कॉंग्रेसच्या प्रचारासाठी त्यांना जावे लागत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे असंही ते पुढे बोलताना म्हणाले.

मनसेचे अनेक कार्यकर्ते आम्हाला भेटतात ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत, कारण राज ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठींबा देण्याची भूमिका त्यांना पटलेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत असंही शेट्टी पुढे बोलताना म्हणाले.

दरम्यान, शनिवारी झालेल्या सभेत सेना आणि भाजपचा विरोधात प्रचार करत त्यांच्या उमेदवारांना निवडणून देऊ नका असं आवाहन राज ठाकरेंनी केले होते. त्यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.