मतदारांच्या माहितीसाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी करणार – राज्य निवडणूक आयुक्त

अमरावती : येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये मतदारांना योग्य उमेदवारांची ओळख होण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्सद्वारे तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन करणार आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये उमेदवारांनी नोंदविलेली स्थावर व जंगम मालमत्ता, शिक्षण आणि उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतची माहिती नमूद करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठात आयोजित निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिली.

यावेळी कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते व यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक लखमी गौतम यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमरावती विभागातील जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूक शांततेत, सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहिम हाती घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिले.

उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र व नामनिर्देशनपत्र 100 टक्के ऑनलाईन भरण्यासाठी मदत केंद्र, सुविधा केंद्रांची सुविधा करून परिसरातील इंटरनेट कॅफेची मदत घ्यावी. यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून उमेदवारांमध्ये जागृती करावी.

यावेळी बोलताना निवडणूक आयुक्त म्हणाले की, महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये सर्व मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या. त्याबरोबरच निवडणुकी दरम्यान उमेदवार करत असलेल्या दैनंदिन खर्चाचा गोषवारा सादर करावा किंवा संपूर्ण खर्च 30 दिवसाच्या आत सादर न केल्यास उमेदवारी रद्द करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना दिल्या. राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीचा खर्च वेळेत सादर करावा. निर्भय व पारदर्शकपणे निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा उपयोग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावा. नाविण्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना आयोगाचा पाठिंबाच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैसा व दारूचा गैरवापर रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी निवडणुकीच्या पुर्वतयारीची माहिती दिली. यामध्ये निवडणूक विषयी संनियत्रण समिती स्थापन केली असल्याची माहिती दिली. दर्यापूर, अचलपूर व अमरावती हे तीन संवेदनशील तालुके असल्याने निवडणुकीदरम्यान अतिरिक्त पोलीस बल आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी गेल्या न.प. निवडणुकीत जिल्ह्यातील दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवल्याने निवडणुकीदरम्यान दारूचा गैरवापर थांबविता आला असल्याची माहिती दिली. संवेदनशील भागातील मतदान केंद्रावर व्हीडिओ शुटिंगची व्यवस्था करावी अशा सुचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी विद्यापिठ परिसरात मतदार जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला निवडणूक आयुक्तांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.