१५ ऑगस्टपासून नगर जिल्ह्यातील मतदारांना ‘स्मार्ट ओळखपत्रां’चे वाटप

अहमदनगर : निवडणुक आयोगाने मतदारांना स्मार्ट कार्ड ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेतला असून नगर जिल्ह्यात देखील मतदारांना स्मार्ट कार्ड ओळखपत्रे देण्याच्या कामाचा शुभारंभ 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व मतदारांना नवीन ओळखपत्रे दिली जाणार असली तरी पहिल्या टप्प्यात नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रे दिला जाणार आहेत. काही वर्षांपूर्वी केंद्रिय निवडणुक आयोगाने राबविलेल्या फोटो ओळखपत्र मोहिमेत देशभरातील सर्व मतदारांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.मात्र सध्या मतदारांकडे असलेली ओळखपत्रे जुन्या पध्दतीची असून त्यावर ब्लॅक अँड व्हाईट अशी छायाचित्रे आहेत.मात्र या ओळखपत्राच्या छपाईचा दर्जा फारसा चांगला नसल्याने ओळखपत्रावरील छायाचित्रात मतदाराचा चेहरा देखील चांगला दिसत नाही.या पाश्र्वभूमीवर 2 वर्षांपूर्वी नगर शहरातील काही प्रभागातील मतदारांना रंगीत छायाचित्र असलेली स्मार्ट कार्ड स्वरूपातील ओळखपत्रे देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला गेला.त्यावेळी ई महा सेवा केंद्रात मतदारांनी माहिती दिल्यानंतर त्यांना काही रक्कम भरून स्मार्ट ओळखपत्रे देण्यात आली होती.या पाश्र्वभूमीवर आता निवडणुक आयोगाने सर्वच मतदारांना स्मार्ट ओळखपत्रे देण्याचे ठरविले आहे.नगर जिल्ह्यात सद्यस्थितीत 32 लाख 40 हजार मतदार असून या सर्वांना स्मार्ट कार्ड ओळखपत्रे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.15 ऑगस्ट पासून मतदारांना नवीन ओळखपत्रे देण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.जिल्हा निवडणुक शाखेकडे पहिल्या टप्प्यात वितरित करण्यासाठी 19 हजार स्मार्ट कार्ड ओळखपत्रे आली आहेत.विशेष म्हणजे ही ओळखपत्रे दीर्घकाळ टिकणारी असून पाणी लागल्याने देखील हे स्मार्ट कार्ड ओळखपत्र खराब होणार नाही.ओळखपत्रात काही चूक झाली असेल तर अर्ज भरून दिल्यानंतर तातडीने दुरूस्ती करून नवीन ओळखपत्र संबंधित मतदाराला उपलब्ध करून दिले जाणार आहे.