जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जावडेकरांना साकडे

पुणे-  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 1 हजार 270 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असून त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली. सर्व शिक्षा अभियान ही योजना केंद्र शासनाकडून राबविली जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी वर्गखोल्या बांधकामाकरीता निधी प्राप्त होत असतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्याकरीता अत्यल्प प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. दुरुस्तीअभावी बऱ्याच वर्ग खोल्यांची परिस्थिीती धोकादायक बनली आहे. सद्यस्थितीत सर्व शिक्षा अभियानाचे पुणे जिल्ह्याकरीताचे अर्थसंकल्पाचे कामकाज सुरु आहे.

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 3674 प्राथमिक शाळा असून एकूण 13 हजार 1 इतक्या वर्गखोल्या आहेत. त्यातील 2170 इतक्या वर्गखोल्या मोडकळीस व धोकादायक असल्याने पुणे जिल्ह्यासाठी नवीन 1270 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्या करीता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, रणजित शिवतरे, अभिजित तांबिले यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांना जिल्ह्यातील शाळांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे निवेदन दिले. दरम्यान जावडेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...