विटावा ते कोपरी खाडी पुलाला मंजुरी आता नवी मुंबईहून थेट ठाणे पूर्व….!

ठाणे/ प्राजक्त झावरे-पाटील – कळवा खाडीपुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरू असताना आता महाराष्ट्र शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान नव्या खाडीपुलाची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून येणारी वाहतूक आता थेट या नव्या पुलामुळे कोपरी पूर्वेतून ईस्टर्न एक्स्प्रेसवर जाणार आहे. तसेच सध्याच्या कळवा खाडीवर अस्तित्वात असलेल्या पुलावरील ताण कमी होऊन येथील वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होणार आहे.

याशिवाय कळवा ते आत्माराम पाटील चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रोड तयार करण्यालाही मान्यता दिल्याने कळव्यातून थेट मुंब्य्राकडे जाणारा रस्ता सुसाट होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांवर अंदाजे ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या कळवा खाडीपुलावर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तिसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कळवानाका ते विटावा आदी भागांत वाहतूककोंडी होत आहे. हा पूल झाला तरी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास खूप मदत होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विटावा ते थेट कोपरी खाडी पूल होण्याबाबतच पाठपुरावा खासदार डॉ. शिंदे करत होते.

या नव्या पुलाच्या बांधकामासाठी ठाणे महापालिकेला तांत्रिक साहाय्याची आवश्यकता भासल्यास आवश्यकतेनुसार एमएमआरडीएने ते करावे, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले असून पुलाचा भार महापालिकेवर पडणार आहे.

*काय आहे या निर्णयात*
• नवी मुंबई ते कोपरी होणार सुसाट
या नव्या पुलावरून वाहतूक थेट कोपरीमार्गे ईस्टर्न एक्स्प्रेसला जाणार.
• कळवा ते आत्माराम पाटील चौक या रस्ता रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाल्याने तो वेगवान होणार आहे. त्यात या मार्गावर सर्विस रोड होणार असल्याने लहान वाहनांसाठीदेखील हा रस्ता फायदेशीर होणार आहे.
• या दोन्ही प्रकल्पांचा खर्च सुमारे ८०० कोटींच्या आसपास असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
——————————————————
या दोनही प्रकल्पांसाठी मी नेहमीच आग्रही होतो. गेली ३-४ वर्ष या बाबत सतत पाठपुरावा करत आहे . या प्रकल्पांमुळे आता कळवा ते ठाणे हा रस्ता मोकळा होणार असून भविष्यात येथे वाहतूककोंडी नावादेखील अजिबात शिल्लक राहणार नाही.
– खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

विटाव्यातील रहदारीला व वाहतूक कोंडीला यामुळे चाप बसेल.
विकास पाटील (स्थानिक नागरिक)