दृष्टिहीनांना मिळाला राजेशाही लग्नाचा अनुभव

क्रिप्स फाउंडेशनतर्फे २५ जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; ३०० दृष्टिहीनांना सहा महिन्याचे अन्नदान

पुणे : सनई-चौघड्याचा निनाद… पारंपरिक वेशभूषा… सजलेली नवरा-नवरी… रुखवत अन कलवऱ्यांची धावपळ… मंगलाष्टकांचा मंजुळ स्वर… एकमेकांच्या डोळ्यात नव्या आयुष्याच्या सुरुवातीची उमेद… आयुष्यातल्या परमोच्य आनंदाच्या क्षणाची चमक… चेहऱ्यावर खुललेले हास्य अन जोडीदाराच्या स्वप्नाची मैफल रंगवत देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने ‘ते’ अडकले पवित्र अशा विवाहबंधनात! आगळ्यावेगळ्या अशा या विवाहसोहळ्याने या दृष्टीहिनांना राजेशाही लग्नाचा अनुभव मिळाला.

निमित्त होते, क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने आयोजिलेल्या २५ दृष्टिहीन जोडप्यांचा (दोघांनाही दृष्टी नसलेले) सामूहिक विवाह सोहळ्याचे. पुण्यात पहिल्यांदाच झालेला हा नयनरम्य आणि हृद्य सोहळा रविवारी गंगाधाम चौकातील जिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजूश्री सभागृहात पार पडला. यावेळी ३०० हुन अधिक लोकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, भावेश भाटिया, संस्थेचे अध्यक्ष मनोहर फेरवानी, सचिव ईश्वर कृपलानी, विश्वस्त भारत नागोरी, महेंद्र जैन, केवल सेठिया, सुरेश जेठवानी, सिमरन जेठवानी, विनोद रोहानी, गोपाल डावरा, रमेश पलंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर या मंगलप्रसंगी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि पारशी धर्माचे धर्मगुरू नवविवाहित जोडप्याना शुभाशिर्वाद देण्यास उपस्थित होते. काशीविश्वेश्वर येथील गुरुजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जोडप्याचे लग्न लावण्यासाठी २५ ब्राम्हण होते. विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असणारा सर्व खर्च क्रिप्स संस्थेने उचलला असून लग्नाच्या आधीचा आणि नंतर सर्व खर्च या संस्थेने केला आहे. रुखवत, झाल, मंगळसूत्र, जोडवी यांपासून घरात आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा यात समावेश आहे. नववधूच्या मेकअपसाठी पुण्यातील नामवंत पार्लर आणि जेवण व्यवस्थेसाठी सुप्रसिद्ध शहाजी केटरर्स,वारातीसाठी दरबार बँड यांनी निशुल्क सुविधा पुरवली आहे. वधूसाठी १५०० चा शालू, नावरदेवासाठी २००० रुपयाचा सलवार-कुर्ता आणि घरसंसारासाठी प्रत्येकी ५१ हजाराचा रुखवत आंदण देण्यात आला.

मनोहर फेरवानी म्हणाले, क्रिप्स फाउंडेशनने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. या दृष्टिहीन मुलामुलींना वैवाहिक जीवनाचा आनंद मिळावा, त्यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजिला. आज राज्यातील २५ दृष्टीहीन दाम्पत्यांचे थाटामाटात लग्न लावून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संसार थाटण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांना संस्थेमार्फत दिल्या आहेत. अनाथ मुलींचे कन्यादान संस्थेच्या स्वयंसेवकांनी केले आहे.

माझ्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे. या गोष्टीची जाणीव कुटुंबाकडून नाही; पण इतरांकडून होत आली आहे. परंतु आज माझे लग्न एवढ्या थाटामाटात होईल, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. परंतु आजचा दिवस हे माझ्यासाठी जणू एक स्वप्नच आहे. या सगळ्यात फाउंडेशनने आम्हाला खूप मदत केली. आता मी एक विशेष मुलगा यात मला काही कमी वाटत नाही, असे मत संस्कार धोत्रे या नवऱ्या मुलाने व्यक्त केले.

इतर मुलींप्रमाणे मलादेखील स्वप्नातला राजकुमार हवा असे. या सोहळ्यामुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. आता आम्ही दोघे मिळून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. एकमेकांचा आधार बनणार आहोत. आयुष्यातला एक आनंदाचा क्षण फाउंडेशनमुळे आम्हाला अनुभवता आला. क्रिप्स फाउंडेशनचे मनापासून आभार मानू इच्छिते,अशी भावना प्रज्ञा शिंदे या नववधुने व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...