कमिटी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रकार म्हणजे केवळ तमाशा : विश्वजित कदम

टीम महाराष्ट्र देशा- सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्तसंघर्ष सुरू आहे. लोकसभेची जागा स्वाभिमानीला दिल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाल्याचं चित्र पहायला मिळाले . पक्षाच्या या निर्णयाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कमिटी कार्यालयाला टाळे ठोकले.

बऱ्याच  दिवसांपासून कोणाचे नाव अंतिम होत नसल्याने गुरुवारी अचानक सांगलीची जागा खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडली जात असल्याचे वृत्त आले. वक्ते इंद्रजित देशमुख हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ही बातमी कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कोणालाही देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कमिटी कार्यालयाला टाळे ठोकले.

याच मुद्द्यावरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी दादा गटाला फटकारले आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस कार्यालयासमोर आज जो प्रकार पाटील गटाकडून करण्यात आला तो तमाशा असल्याची टीका त्यांनी केली. अजून तिकीटसाठी प्रयत्न केल्यास अवघड नाही. पण ते करण्याऐवजी गप्प का बसले आहेत, असा सवालही विश्वजीत कदम यांनी केला आहे.