नांगरे पाटील ‘अॅक्शन मोड’मध्ये, आता बाहेर पडूनच दाखवा

नाशिक : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुन सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. संपूर्ण राज्यासह नाशिकमध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळाले. यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गरज नसताना बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्या जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जमावबंदी आणि संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या गाड्या तीन महिन्यांसाठी जप्त केल्या जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुन सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी या आपतकालीन स्थितीत विश्वास नांगरे पाटील यांनी थेट गाडी जप्तीचा जालीम उपाय शोधला आहे. यामुळे एकदा बाहेर फिरायला आलेल्या अतिशहाण्याची गाडी जप्त होणार आहे.

नाशिक प्रशासनकडून नागरिकांची लॉकडाऊनच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून काही उपाययोजनाही करण्यात येत आहे. नागरिकांच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेल्सला केवळ पार्सल सेवा सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत नसलेल्या नागरिकांना संबंधित हॉटेल्सला ऑर्डर करुन आपलं जेवण मागवता येणार आहे.