fbpx

“साहेबांच्या माघारी आता आपली जबाबदारी”, विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली: पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून विश्वजित कदम यांनी आज अर्ज भरला. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागी त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्यात आली आहे.

यावेळी काँगेसकडून माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, कै. पतंगराव कदम यांच्या पत्नी विजयमाला कदम यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून येत्या २८ मे रोजी मतदान होणारआहे. ३१ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पतंगराव कदम करायचे. ९ मार्च २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना ३ मे रोजी जारी होणार असून, १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असेल.

पतंगराव यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी विश्वजित कदम हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी त्यांनी २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या अनिल शिरोळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.