चंद्रकांत दादांच्या टोल्यावर विश्वजीत कदमांचे प्रत्युत्तर

vishwajeet kadam

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे आणि राज्यातील युतीच्या सर्व २८८ उमेदवारांसाठी काम करणे हाच मुख्य उद्देश आहे , असे सांगत राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना काँग्रेसच्या कार्याध्यक्षांवर टोलेबाजी केली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले. काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपामध्ये सामिल झाल्यास आश्चर्य वाटालयला नको, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला. पाटलांच्या या टोल्यानंतर माध्यमांनी ‘त म्हणता ताक’ ओळखत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याकडे धाव घेतली. मात्र पाटलांचे हे विधान हास्यास्पद आहे, असे सांगत मी काँग्रेसशी एकनिष्ठ आहे, असा दावा केला.

याबाबत विश्वजीत कदम म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे सतत असे विधान करत असतात. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या खांद्यावर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ते सतत अशी विधाने का करतात हे त्यांनाच ठाऊक, असेही कदम म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसने अखेर पक्ष संघटनेवर लक्ष दिल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली बाळासाहेब थोरात यांची निवड त्याचेच संकेत देत आहेत. प्रदेश कॉंग्रेसच्या समितीत थोरात यांच्या बरोबरीने नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.