विरेंद्र सेहवाग राजकीय मैदानात; ‘या’ नेत्याच्या विरुद्ध लोकसभा लढणार?

blank

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय क्रिकेट टीमचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग लवकरच राजकीय मैदानात उतरण्याची शक्यता आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सेहवाग भाजपकडून हरयाणामध्ये निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. सेहवागला रोहतकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत सहभागी झालेल्या एका वरिष्ठ नेत्याने रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांना मात देण्यासाठी सेहवागच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अजून विरूने भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाने सेहवागच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. आता हा चेंडू सेहवागच्या पुढ्यात असून फक्त त्याच्या होकाराला उशीर आहे. तसेच एका नेत्याला सेहवागशी बोलण्याची जबाबदारी देण्यात आली असून तो नेता दिल्ली आणि एनसीआरमध्ये जास्त सक्रिय असल्याचेही ते म्हणाले.