कसोटीत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर पाचव्यांदा बाद; जाणून घ्या आधीचे रेकॉर्ड्स

virat kohli

इंग्लंड : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारी ४ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले. भारतीय वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर अटोपला. सध्या भारताची फलंदाजी सुरु असून सलामी जोडीने स्थिर खेळीचा प्रयत्न केला. मात्र दुपारच्या जेवणाआधी रोहित शर्मा ३७ धावांवर बाद झाला.

रोहित शर्मा गेल्यानंतर भारतीय फलंदाजी गडगडल्याचे दिसून येत आहे. के एल राहुल याने अर्धशतकी खेळी करत गड लढवता ठेवला असला तरी त्याला दुसऱ्याबाजूने योग्य साथ मिळत नसल्याचे सध्या दिसत आहे. शर्मा बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा खेळण्यास आला. त्याच्याकडून मोठ्या आणि संयमी खेळीची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र १६ चेंडूंमध्ये ४ धावा करत तो बाद झाला.

यानंतर कर्णधार विराट कोहली खेळण्यास आला असता त्याने चाहत्यांच्या अपेक्षा भंग केल्या. एकही धाव न काढता तो पहिल्याच चेंडूवर म्हणजेच गोल्डन डकने बाद झाला. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जोस बटलरने टिपलेल्या झेलाने कोहली बाद झाला. विराटची गोल्डन डकने बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे.

याआधी २०११/१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात, २०१४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडच्या विरोधात, २०१८ ओव्हलवर इंग्लंड विरोधात, २०१९मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिज विरोधात आणि आज ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंड विरोधात तो गोल्डन डकवर बाद झाला आहे. मोठ्या खेळीची अपेक्षा असताना मधली फळी ढासळल्याने इंग्लंड विरोधात अधिक धावांनी आघाडी घेण्याचे आव्हान आहे. दरम्यान, विराट पाठोपाठ अजिंक्य रहाणे(५ चेंडू, ५ धावा) हा रन आऊट झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या