fbpx

पिण्याच्या पाण्याने गाडी धुतली, विराट कोहलीला महापालिकेने ठोठावला दंड

टीम महाराष्ट्र देशा- पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुग्राम महापालिकेने कोहलीला पाचशे रुपयांचा दंड केला आहे. कोहलीच्या गुरुग्राममधील निवासस्थानी काम करणारे कर्मचारी गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याची नासाडी करत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार विराट कोहलीच्या शेजाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. विराटच्या घरासमोर अर्धा डझन कार पार्क केलेल्या असून त्या धुण्यासाठी हजारो लीटर पिण्याचे पाणी वापरले जात असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली आहे.

उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा तब्बल ४५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. गुरूग्राममध्येही पाणी टंचाईच्या समस्या सतावत आहेत. यातच कोहलीसारख्या आणखी १० घरांना याबाबतचे चलन जारी करण्यात आले आहे.